मुंबई : कथित फसवणूक प्रकरणात कुर्ला पोलिसांनी व्हिझा मुदतवाढीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात फराज मलिक आणि त्याची पत्नी लॉरा हेमेलिन यांनी सोमवारी दाखल केलेल्या याचिकांना न्यायालयाने परवानगी दिली. कुर्ला पोलिसांनी त्यांच्या याचिकेला विरोध केला होता. तपास अधिकाऱ्याने सांगितले होते की, या प्रकरणाचा तपास चालू आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची चौकशी करिता त्यांची कोठडी आवश्यक आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचे पालन : मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे म्हटले की आरोपींवर जे आरोप दाखल आहेत. ते गुन्हे आहेत ज्यासाठी कमाल शिक्षा सात वर्षांची आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. न्यायालयाने म्हटले की या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोघांना आपल्यासमोर हजर राहण्यास सांगण्यासाठी कोणतीही नोटीस बजावली नाही. तपास अधिकाऱ्याने मार्गदर्शक तत्त्वांचा कोणताही विचार केला नाही. परंतु लगेचच त्यांनी दोन्ही अर्जदारांना अटक करायची आहे आणि त्यांची पोलिस कोठडी आवश्यक आहे असा निष्कर्ष काढला. माझ्या मते हा एक उडी मारणारा आणि अकाली निष्कर्ष आहे ज्यात हस्तक्षेप आवश्यक आहे.
जामिनाची केली मागणी : कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात फराझ मलिक आणि त्याची पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयेशा यांच्याविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघांनी अटकेच्या भीतीने सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी या दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलासा दिला. यावेळी न्यायालयाने पोलिसांनाही झापले.
कोणताही पुरावा आढळला नाही : अटकेचे दूरगामी परिणाम होतात. यामुळे केवळ अटक केलेल्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबियांनाही आयुष्यभर याचा सामना करावा लागतो असे अटकपूर्व जामीन मंजूर करताना दिलेल्या आदेशामध्ये न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी म्हटले. फराझ मलिक आणि त्याची पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयेशा यांनी व्हिसा मुदतवाढीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. तसेच जामीन अर्ज फेटाळण्यासाठी तपास अधिकाऱ्याने मांडलेले कोणतेही कारण समाधानकारक नव्हते असेही न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण : पर्यटक व्हिझाचे दीर्घकालीन व्हिझामध्ये रूपांतर करण्यासाठी कथित बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप फराझ आणि त्याची फ्रेंच पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयेशा यांच्यावर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्याविरोधात कलम 420, 465, 468, 471, 34 IPC नुसार गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांना ईडीकडून दुसरे समन्स