मुंबई - सरकारने शहरातील रेड झोन वगळता दारू विक्रीची दुकाने उघडण्यास दिली. त्यामुळे सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी दुकानासमोर लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली. पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण आणण्याची वेळ आली. कोरोनाच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे दारूच्या दुकानासमोरील गर्दीला आळा घालून ही गर्दी नियंत्रणात आणावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई सहपोलीस चौबे यांच्याकडे केली.
कोरोनासारखी संकटाची परिस्थिती असताना व पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा आधीच प्रचंड ताण असताना सध्या पोलिसांची कुमक दारू दुकांनासमोरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी वापरली जात आहे. दारू विक्रींच्या दुकांनासमोर सोमवारी मुंबई व मुंबई उपनगरात हजारोंची गर्दी होती. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आलेले नाहीत. अश्या परिस्थितीत कोरोना वाढण्याची भीती अधिक आहे. मुंबईकरांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तत्काळ कारवाई करावी अन्यथा दारुची दुकाने बंद करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी केली आहे.