मुंबई - महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दहिसर कांदरपाडा येथे वाढदिवसाचा केक खाल्याने विषबाधा झालेले तब्बल ३३ जण पालिकेच्या भगवती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दोन दिवस नव्हती. यामुळे या विभागाच्या एकूण कारभारावरच नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विभागात सुधारणा करण्याची मागणी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केली आहे.
दहिसर पश्चिम येथील कांदारपाडा परिसरात राहणारे अर्जुन सिंग यांच्या मुलीचा मंगळवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केक, बिर्याणी आदी पदार्थ खाल्ल्यानंतर उपस्थितांपैकी काहींची तब्येत बिघडून उलट्या होऊ लागल्या. काहींच्या पोटात दुखू लागले. या प्रकारानंतर बुधवारी भगवती रुग्णालयात २३ जणांना दाखल करण्यात आले. अशा घटना घडल्यावर या विभागाकडून महापौर, समिती अध्यक्ष आणि नगरसेवकांना याची माहिती दिली जाते. मात्र, दहिसर येथील विषबाधा प्रकरणात २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तरी त्याची माहिती आपत्कालीन विभागाला नव्हती, असे शितल म्हात्रे यांनी सांगितले.
हेही वाचा - जीएसटी कायद्याच्या अधिनियमात होणार 22 सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
या घटनेची माहिती मिळाल्यावर मी अनेक रुग्णालयांमध्ये भेटी दिल्यावर बोरिवली येथील भगवती रुग्णालयात रुग्णांना दाखल केल्याचे समजले. या रुग्णालयात रुग्ण दाखल असले तरी त्यांची लहान मुले घरीच होती. त्यांना भगवती रुग्णालयात लहान मुलांचा वॉर्ड नसल्याने दाखल करण्यात आले नव्हते. पालक एका ठिकाणी आणि त्यांची मुले इतर ठिकाणी उपचारासाठी दाखल केल्यास त्यांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून कूपर रुग्णालयातून लहान मुलांच्या डॉक्टरांना भगवती रुग्णालयात उपचारासाठी बोलावण्यात आले. लहान मुलांकडे दुर्लक्ष झाले असते तर त्यांचे काहीही झाले असते, असे म्हात्रे यांनी सांगितले.
हेही वाचा - रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांवर उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - राखी जाधव
याप्रकरणी बोलताना म्हात्रे म्हणाल्या, की विषबाधा प्रकरणाची माहिती मी गुरुवारी आपत्कालीन विभागाला दिल्यावर त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य कळाले. तोपर्यंत या विभागाला विषबाधेचे इतके मोठे प्रकरण होऊनही त्याची माहिती नव्हती. पालिकेचा आपत्कालीन विभाग नावाजलेला विभाग आहे. अशा विभागाला अशा घटनांची माहिती नसल्याने आमच्यासारख्या नगरसेवक, समिती अध्यक्ष, महापौर यांना माहिती मिळत नसल्याची तक्रार म्हात्रे यांनी केली असून या विभागात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - 'कॅब'चा मुस्लिमांसह अनेक धर्म, गरिबांना सहन करवा लागणार त्रास
दरम्यान, विषबाधा प्रकरणातील बाधित रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून अद्यापही हे रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून विषबाधा नेमकी कशामुळे घडली याची चौकशी सुरू आहे.