मुंबई : कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आजार आहे. तो रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये पसरतो. 11 मार्च 2020 रोजी आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विषाणूची लागण झाली. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला होता. सुरुवातीला इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्ण होते. त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून कोरोना झोपडपट्टीत पसरला. मुंबईमध्ये धारावी, वरळीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना पसरल्याने मुंबईकरांमध्ये भीती पसरली होती.
बेड्स कमी पडू लागले: मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्यानंतर रुग्णांचे मृत्यू होऊ लागले. सरकार मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग यांनी रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. महापालिकेची रुग्णालय सरकारी रुग्णालय यामधील बेड्स कमी पडू लागल्याने जम्बो कोविड सेंटर उभारली. त्यामध्ये लाखो रुग्णांवरती उपचार करण्यात आले.
या राबवल्या उपायोजना: मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू पसरू नये म्हणून, डॉक्टर आपल्या दारी, ट्रेसिंग टेस्टिंग ट्रीटींग आणि ट्रीटमेंट, धारावी पॅटर्न, मुंबई पॅटर्न याची अंमलबजावणी केली. रुग्णालयात रात्रीचे मृत्यू होत असल्याने रुग्णांना बेडवरतीच शौचाचे भांडे देण्यात आले. यामुळे शौच आणि मूत्रालयात जाताना चक्कर येऊन मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. मुंबई महापालिकेने राबवलेल्या मुंबई पॅटर्नची दखल देशभरात आणि जगभरात घेण्यात आली आहे.
पुन्हा रुग्णसंख्या वाढली: मुंबईमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. पहिल्या लाटेमध्ये 2800, दुसऱ्या लाटे मध्ये 11 हजार, तिसऱ्या लाटे मध्ये 21 हजार रुग्ण दिवसाला आढळून आले. चौथ्या लाटेत ही रुग्णसंख्या वाढेल अशी भीती असताना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास आरोग्य विभागाला यश आले. गेले काही महिने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात होती. मात्र मार्च महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 10 मार्च 2023 रोजी मुंबईत 21 रुग्णांची तर राज्यात 93 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
तीन वर्षात इतक्या रुग्णांची नोंद : मार्च 2020 पासून 10 मार्च 2023 पर्यंत तीन वर्षांत राज्यात 81 लाख 38 हजार 222 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 79 लाख 89 हजार 393 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 424 रुग्णांचा मृत्यूऊ झाला आहे. मुंबईत गेल्या 3 वर्षात 11 लाख 55 हजार 503 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.