मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशासह राज्यात 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार आहे. मुंबई मनपा लसीकरणासाठी सज्ज आहे. मात्र लसींचा पुरवठा त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाल्या, की प्रत्येक वार्डमध्ये लसीकरण केंद्र उभारणार असून त्याद्वारे लसीकरणाचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मुंबईत खासगी रुग्णालयात देखील लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत. प्रत्येक जण आपली ताकद पणाला लावणार आहे. मात्र लसीचा पुरवठा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच लासीकरणाबाबत अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचं म्हणाल्या. अपुऱ्या पुरवठ्यामुळे काही ठिकाणी गोंधळ झाला होता. लस उपलब्ध झाली नाही तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे कोविन ॲपमध्ये नोंदणी झाल्यानंतर लस मिळत असल्याची खात्री पटल्यानंतर लस घेण्यासाठी जावे. आयुक्त स्तरावर सध्या चर्चा सुरू आहेत. गाइडलाइन मिळाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. तसेच सर्वांना माहिती दिली जाईल, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.