मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून आता मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने विषाणूची संक्रमण साखळी तोडण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. टाळेबंदीला सर्वत्र विरोध होत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कडक निर्बंध लागू होणार आहेत. मुंबईत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये निर्बंध कसे ठेवायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकारी घेत आहेत.
बेडसाठी आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा मृत्यू
नाशिक शहरातील अनेक रुग्णालये पालथी घालूनही बुधवारी दोन कोरोना रुग्णांना बेड मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. मात्र, यातील एका रुग्णाचा बिटको रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आंदोलनात घेऊन येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात का वाढतोय कोरोना? तज्ज्ञ सांगतात..
अनेक शहरांमध्ये एमआयडीसी, उद्योग-धंदे आहेत, त्यामुळे अनेक लोक एकत्र संपर्कात येऊन काम करतात. त्यामुळे विषाणूचे संक्रमण होत आहे. त्यात मास्क न वापरण्याची लोकांची वृत्ती भर घालते. तसेच वर्कर फ्रॉम होम असताना लोक घराबाहेर पडतात. सोशल, फायनान्सिएल, प्रोफेशनल कामासाठी लोक बाहेर पडतात. त्याच बरोबर राज्यात कोरोनाचे दोन स्ट्रेन आढळून आले आहेत. यांची संसर्ग होण्याची क्षमता जास्त आहे. या सगळ्यांची परिणीती राज्यात कोरोना वाढण्यात झाली आहे, असे कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
नाशिकमध्ये बेडविना कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेला जबाबदार संबंधित अधिकारी आणि इतरांसह सरकारवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली. या घटनेच्या अगोदर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मी दौरा केला होता, त्या ठिकाणी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या फारच कमी असल्याचे मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो, पण फारसा फरक दिसत नाही, असेही ते म्हणाले.
मुंबई डेंजर झोनमध्ये
संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला तर ३१ मार्चला ३ हजार ९०० बेड्स उपलब्ध आहेत. ३२४ आयसीयू तर १७० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या वाढत आहे, त्याप्रमाणे धोकादेखील वाढत आहे. त्यासाठी १६ हजारांहून २५ हजार बेड्स उपलब्ध करून दिले जात आहेत. पालिकेची बेड वाढवण्याची तयारी सुरू आहे. सामान्य प्रवाशांना दिलेली रेल्वे प्रवासाची मुभाही रद्द करण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
नाशिकला ४० लाख लसी द्या
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून रुग्णवाढीच्या संख्येत देशातील पहिल्या दहा शहरात नाशिकचा समावेश आहे. ही वाढ कमी करायची असेल तर लसीकरण वाढवणे हा एकमेव उपाय आहे. पहिला व दुसरा टप्पा मिळून ४० लाख लसींचा पुरवठा करावा, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्राच्या आरोग्य सेवा संचालकांना पाठविले आहे.