मुंबई: शहरात २० एप्रिल रोजी मागील आठवडाभरात सरासरी ०.०१७६ टक्के इतका 'पॉझिटिव्हिटी रेट' आहे. पालिकेच्या २४ विभागांपैकी ई विभाग भायखळा ०.०१८१, एल विभाग कुर्ला ०.०१९८, एफ नॉर्थ दादर धारावी ०.०२०९, डी विभाग मलबार हिल ०.०२१८, के ईस्ट विभाग अंधेरी पूर्व ०.०२४२, ए विभाग कुलाबा ०.०२८६, के वेस्ट विभाग अंधेरी पश्चिम ०.०३०७, बी विभाग सँडहर्स्ट रोड ०.०३४१, एच वेस्ट विभाग बांद्रा पश्चिम ०.०३४९ टक्के इतका 'पॉझिटिव्हिटी रेट' नोंद झाला आहे. या ९ विभागात सर्वाधिक पॉजिटिव्हिटी रेटची नोंद करण्यात आली आहे.
काय असतो पॉजिटिव्हिटी रेट? कोरोना रुग्ण शोधण्यासाठी 'आरटीपीसीआर' चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमधून जितके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असतात त्यावरून 'पॉजिटिव्हिटी रेट' ठरवला जातो. आठवडाभरात किती चाचण्या झाल्या आणि त्यात किती रुग्ण आढळून आले यावर आठवड्याचा सरासरी 'पॉजिटिव्हिटी रेट' काढला जातो. यावरून संबंधित विभागात कोरोनाचा प्रसार किती झाला हे समोर आल्याने प्रसार रोखण्यासाठी मदत होते.
४२ रुग्ण ऑक्सिजनवर? मुंबईत २१ एप्रिल रोजी २२६ रुग्ण आढळून आले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २८२ रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून गेल्या ३ वर्षांत एकूण ११ लाख ६१ हजार ५६९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ४० हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४६६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ११६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असून ४२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
घाबरू नका, काळजी घ्या: मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्ण घरीच बरे होत आहेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोरोना नियमांचे पालन करावे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
केंद्राचे राज्याला पत्र: देशात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. २० एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात पॉजिटिव्हिटी रेट ५.५ टक्के इतका नोंदविण्यात आला. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, केरळ या राज्यात कोरोनाचे प्रसारण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या आठ राज्यांना पत्र पाठवले आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. महामारी व्यवस्थापनासाठी सतर्क राहा. रुग्णसंख्येची आकडेवारी रोज अद्ययावत करण्यात यावी.कोरोना चाचण्या वाढवण्यात याव्यात तसेच नमुने निनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.