नवी मुंबई - इंडिया बुल्स येथे क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या सीबीडीतील टाटा नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या 25 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कोरोनाबाधित तरुण पळून जाऊन आपल्या सासरवाडी येथे पोहोचला असता तिथूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यादरम्यान संबंधित तरुणाने पोलीस व पत्नीला स्पर्श केल्याने त्यांना सॅनिटायझरने अंघोळ घालण्यात आली.
कोरोनाबाधित 25 वर्षीय तरुण सीबीडीतील टाटा नगर झोपडपट्टीत राहण्यास आहे. त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन आठवड्यापूर्वी त्याच्या कुटुंबातील 6 सदस्यांना पनवेलमधील इंडिया बुल्स येथे क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. मागील 14 दिवस हे सर्व क्वारन्टाईनमध्ये उपचार घेत होते. मात्र, या 25 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी त्याच ठिकाणी थांबण्यास सांगून त्याच्या कुटुंबातील 5 सदस्यांना बुधवारी सकाळी रुग्णवाहिकेतून बेलापूर येथे सोडले.
मात्र, यावेळी चोरून कोरोनाबाधित असलेला तरुणदेखील त्यांच्यासोबत रुग्णवाहिकेतून बेलापूर येथील टाटा नगर झोपडपट्टीत पोहोचला. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाल्यानंतर तो रुग्णवाहिकेतून बेलापूर येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना व पोलिसांना देण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलीस त्याचा शोध घेत बेलापूर येथे पोहोचले. त्यामुळे या संशयीत तरुणाने आपल्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला व थेट तो तरुण सासरवाडीत पत्नीला भेटण्यासाठी गेला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला सीबीडी पोलीस स्टेशनसमोर पकडले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर सॅनिटायझरची फवारणी करून त्याला पुन्हा रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवून दिले. या प्रकारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. यादरम्यान त्याने स्वतःच्या पत्नीला व पोलिसांनाही स्पर्श केला. त्यामुळे त्यांच्यावरही सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे.