मुंबई - डॉक्टरांना सुट्टी मिळावी म्हणून नंदुरबारच्या रेल्वे आयसोलेशन कोचमध्ये उपाचर घेत असलेल्या कोविड रुग्णांना सक्तीने इतर ठिकाणी हलविण्यात आले. त्यामुळे, कोविड आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका बसला आहे.
हेही वाचा - मुंबईत 2 हजार 403 कोरोनाग्रस्त नवे रुग्ण, 68 रुग्णांचा मृत्यू
कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलवले
राज्यातील कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर असून एकीकडे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे, आरोग्य सुविधेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. हा ताण दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढे आली होती. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण 128 आयसोलेशन कोच तयार करण्यात आले होते. यापैकी 21 आयसोलेशन कोचचा वापर नंदुरबार येथे करण्यास सुरुवात केली. नंदुरबार रेल्वे स्थानकात 18 एप्रिलपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आयसोलेशन कोच कोरोना रुग्णांसाठी खुले करण्यात आले होते. तब्बल १७ दिवसांपासून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र, काल अचानक रेल्वेच्या आयसोलेशन कोचमधील कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले. त्यामुळे, कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
आयसोलेशन कोचचे डॉक्टर सुट्टीवर
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, सुमित ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारतला' सांगितले की, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, आयसोलेशन कोचमध्ये तैनात असलेले वैद्यकीय कर्मचारी ५ ते ७ दिवस सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे आयसोलेशन कोचमधील सर्व कोरोना रुग्णांना उपचार बंद राहणार आहे. त्यामुळे, कोचमधील कोरोना रुग्णांना उपचारासाठी दुसरीकडे हलवण्यात आले आहे. जेव्हा वैद्यकीय कर्मचारी सुट्टीवरून परत येणार, तेव्हा आयसोलेशन कोचमधील उपचार सुरू करण्यात येणार आहे. तसेच, नंदुरबार रेल्वे स्थानकावरून आतापर्यंत आयसोलेशन कोच हटविण्याचे आदेश दिलेले नाहीत.
२३ कोरोना रुग्ण घेत होते उपचार
पश्चिम रेल्वेच्या नंदुरबार स्थानकावर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी २१ आयसोलेशन कोच 18 एप्रिल २०२१ पासून खुले करण्यात आले. ७ मे २०२१ पर्यंत नंदुरबारच्या आयसोलेशन कोचमध्ये एकूण ११६ कोरोना रुग्ण दाखल करण्यात आले होते. यापैकी ९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. २३ कोरोना रुग्ण अद्यापही रेल्वेच्या आयसोलेशन कोचमध्ये उपचार घेत होते. मात्र, काल अचानक या २३ कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले.
रुग्णाच्या देखभालीसाठी ४२ जणांचा स्टाफ
नंदुरबार येथील रेल्वेच्या २१ कोचमध्ये 336 खाटा उपलब्ध आहेत. या आयसोलेशन कोचमध्ये भर्ती होणाऱ्या कोरोना रुग्णाच्या देखभालीकरिता राज्य सरकारकडून १३ डॉक्टर नियुक्त करण्यात आले होते. तसेच, परिचारिका, वॉर्डन आणि स्वछता कर्मचारी मिळून ४२ जणांचा स्टाफ होता. या शिवाय आयसोलेशन कोचमध्ये सध्या २३ कोरोना रुग्ण दाखल होते. रुग्णाच्या जेवणाची सोय राज्य सरकारच्या मदतीने रेल्वे स्थानकांच्या कॅटरिंगमधून केली जात होती. प्रत्येक रुग्णांसाठी प्रत्येकी एक बेड रोल, उशी, नॅपकीन, कचऱ्याचा डबा ठेवण्यात आला आहे. एका डब्यात 9 कुलर आहेत.
हेही वाचा - 'राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी'