मुंबई - राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. रविवारी तब्बल दोन महिन्यानंतर 4 हजार 92 रुग्ण आढळून आले होते. काल (सोमवारी) त्यात काही प्रमाणात घट होऊन 3365 नवे रुग्ण आढळून आले होते. आज (मंगळवारी) पुन्हा रुग्णसंख्या वाढली असून 3663 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला.
3 हजार 663 नवीन रुग्ण -
आज राज्यात 3663 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 71 हजार 306वर पोहोचला आहे. तर आज 39 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 591 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.66 टक्के तर मृत्यूदर 2.49 टक्के आहे. राज्यात आज 2700 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 81 हजार 408वर पोहचला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 53 लाख 96 हजार 444 नमुन्यांपैकी 20 लाख 71 हजार 306 नमुने म्हणजेच 13.45 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 82 हजार 970 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 37 हजार 125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊनला समोर जावे लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रुग्ण संख्या वाढली -
दोन महिन्यानंतर पुन्हा वाढ झाली होती. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. तब्बल दोन महिन्याने रविवारी 14 फेब्रुवारीला पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली होती. रविवारी 4092 नवे रुग्ण आढळून आले होते. काल सोमवारी त्यात काही प्रमाणात घट होऊन 3365 रुग्ण आढळून आले. आज त्यात पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.