मुंबई - मागील तीन-चार महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने घट होत होती. मागील दोन महिने कोरोना रुग्णांचा आकडा 2 हजार ते 2500 च्या घरात राहत होता. तर येत्या काही महिन्यात हा आकडा तीन अंकी होईल अशी आशा व्यक्त होत होती. पण या आशेवर पाणी पडले आहे. कारण आठवड्याभरापासून रुग्णांची संख्या वाढत असून, 14 फेब्रुवारीला तर हा आकडा कित्येक दिवसांनंतर 4 हजार पार गेला आहे. यामुळे आता राज्याच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. तर नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे आणि कोरोना संपला या गैरसमजामुळे मास्क वापरणे अनेक नागरिकांनी सोडून दिल्याने कोरोना वाढत असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर नागरिकांनी मास्क वापरावे, फिजिकल डिस्टनसिंग पाळावे असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले आहे. त्याचवेळी ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्याच्या टास्क फोर्सने राज्य सरकारला दिला आहे.
16 डिसेंबरनंतर 14 फेब्रुवारीला रुग्णसंख्येचा आकडा 4 हजाराच्या पुढे
मार्च 2020 मध्ये राज्यात पुण्यात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिलपासून रुग्णसंख्या वाढतच गेली. कडक लॉकडाऊन करूनही रुग्णांचा आकडा वाढताच होता. काही महिन्यांनंतर तर राज्यात 15 हजार रुग्ण दिवसाला आढळू लागले. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर कोरोना रुग्णांचा आकडा थेट 23 हजाराच्या पार करून पुढे गेला. त्यानंतर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी कंबर कसली. ट्रेसिंग-टेस्टिंग-ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देत कोरोना नियंत्रणात आणला. परिणामी मागील दोन महिन्यापासून राज्यात दिवसाला 2000 ते 2500 रुग्ण आढळत होते. पण आता मात्र मागील आठवड्याभरापासून हा आकडा वाढू लागला असून आधी 3000 आणि आता थेट 4000 वर रुग्ण संख्या गेली आहे. याआधी 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळले होते. त्यानंतर दोन महिन्यांनंतर 4 हजाराच्या वर आकडा गेला आहे. मात्र त्याचवेळी एक दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण वाढत असले तरी मृत्यु दर खूपच कमी झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्क्यांवर गेला आहे.
कोरोना संपला नाही, संपणार नाही
कोरोना कमी होत असल्याने लस आली असल्याने आता लवकरच कोरोना नियंत्रणात येईल, मुंबईत कोरोनाचा आकडा दोन अंकी तर राज्यात तीन अंकी होईल असे वाटत होते. पण दोन दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजार आणि त्यावरून 4 हजारावर गेला आहे. ही नक्कीच चिंता वाढवणारी बाब असल्याचे डॉ संजय लोंढे, सदस्य, आयुष टास्क फोर्स, महाराष्ट्र यांनी दिली आहे. कुठलाही विषाणू कायमचा संपत नाही, संपला नाही. असे असताना कोरोना कमी झाला असताना लोकांना कोरोना संपल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे लोकं आता आधी प्रमाणे बाहेर फिरू लागले आहेत, गर्दी करू लागले आहेत. त्यातही महत्वाचे म्हणजे कोरोना संपला असे डोक्यात घेत अनेकांनी मास्क वापरणेच सोडून दिले आहे. कामासाठी वा इतर अपरिहार्य कारणासाठी बाहेर जावे लागत असल्याने रेल्वे, बस मध्ये सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्य नाही. पण मास्क योग्य प्रकारे वापरणे शक्य असताना अनेकांनी मास्क वापरणे सोडून दिले आहे. हेच मुख्य कारण कोरोना रुग्ण वाढण्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळेस कोरोना कधी ही संपणार नाही, कोरोना संपला नाही. देशातील सर्वच्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले तरी कोरोना संपणार नाही. कारण कोणताही विषाणू संपत नाही. तेव्हा नागरिकांनी निष्काळजी न राहता मास्क वापरावा, असे आवाहन डॉ लोंढे यांनी केले आहे.
लस घेतलेल्यानी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे
आम्ही धुळे-मालेगावमध्ये रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यानुसार रुग्ण संख्या कमी ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत. पण राज्यात रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक आता मास्क आणि फिजिकल डिस्टनसिंगचे नियम पाळणे सोडून देऊ लागले आहेत. लसीचा दुसरा बूस्टर डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनंतर त्याची परिमाणकारकता सुरू होते, अँटिबॉडीज तयार होण्यास सुरुवात होते. पण लस ही 100 टक्के परिणामकारक नाही. त्यामुळे लस घेतलेल्यानी ही मास्क आणि फिजिकल डिस्टनसिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया डॉ पल्लवी सापळे, अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांनी दिली आहे.
एका रुग्णाच्या मागे 20 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा-डॉ राहुल पंडित
नागरिक मास्क वापरत नसल्याने कोरोना वाढत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. तर राज्याच्या टास्क फोर्सचेही हेच म्हणणे आहे. लोकांनी मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टनसिंग पाळणे सोडून दिल्याने तसेच मोठ्या संख्येने लोक आता बाहेर पडू लागल्याने रुग्ण संख्या वाढू लागल्याचे डॉ राहुल पंडित, सदस्य, कोविड टास्क फोर्स, महाराष्ट्र यांनी सांगितले आहे. मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन झाले नाही तर नक्कीच पुढे परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच टास्क फोर्स म्हणून राज्य सरकारला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. त्यात मास्क-फिजिकल डिस्टनसिंगची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ट्रेसिंग आणि टेस्ट वाढवाव्यात, एका रुग्णाच्या मागे किमान 20 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे असा हा सल्ला दिल्याचे ही डॉ पंडित यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - विरोधकांच्या बोलण्यात तथ्य नाही, चौकशीतून सत्य पुढे येईल - गृहमंत्री अनिल देशमुख
हेही वाचा - पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, कर्ज फेडीसाठी बॅंकेने कधीच नोटीस पाठवली नाही