मुंबई - राज्यावर कोरोनाबरोबर निसर्ग चक्रीवादळाचेही संकट आले आहे. उद्या मुंबईत मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसी एमएमआरडीए मैदानावरील कोविड सेंटरमधील 242 रुग्णांना वरळीतील एनएससीआय कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी बीकेसीत 1008 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. गेल्या सोमवारपासून या रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. तर आज सकाळपर्यंत येथे 242 रूग्ण दाखल होते. अंबेजोगाईवरून आलेल्या 38 निवासी डॉक्टरांची टीम येथे कार्यरत आहे.
आता मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. अशावेळी बीकेसीचा परिसर मिठी नदी लगत येतो आणि हा सखल भाग म्हणून ओळखला जातो. साधारण पाऊस झाला तरी बीकेसीत पाणी साचते. आता चक्रीवादळाचा धोका असल्याने पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता या रुग्णांना येथून हलवण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे. या रुग्णांना वरळी एनएससीआयमध्ये हलवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान अंबेजोगाईच्या डॉक्टरांना आता सेव्हन हिल्स रुग्णालयात कामाला लावण्यात येण्याची शक्यता आहे.