मुंबई - रेल्वे स्थानकावर आणि पादचारी पुलांवर बूट पॉलिश करणारे लोक आपण नेहमीच पाहतो. ऑफिसला जाणार्या साहेबांचा बुट चकाचक करणाऱ्या या पॉलिशवाल्यांच्या आयुष्याची चकाकी मात्र कोरोनामुळे नाहीशी झाली आहे. पोटाची भूक क्षमवण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असताना मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्न अशा अनेक समस्या आयुष्यात आवासून उभ्या ठाकल्या आहेत. अशा काही बूट पॉलिश कामगारांनी आपल्या व्यस्था ईटीव्ही भारत समोर मांडल्या आहेत.
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ?
गेल्या वर्षापासून लॉकडाऊनमुळे लोकल सेवा सतत बंद केली जात आहे. आता पुन्हा एकदा कडक निर्बंध लावल्याने लोकल प्रवासी संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनापूर्वी रेल्वे स्थानकावर बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांची प्रत्येक दिवशी 500 ते 600 रुपये कमाई होत होती. त्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह सुद्धा व्यवस्थित चालत होता. मात्र, गेल्या एका वर्षापासून या व्यवसायावर कोरोनाचे संकट आले आहे. परिणामी कुटूंबाचा गाडा कसा हाकायचा? असा मोठा प्रश्न मुंबई आणि उपनगरातील 500 बूट पॉलिश कामगारांना उपस्थित करत आहे.
कर्जाचे ओझे वाढले
सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्या दयानंद राम यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, राज्य सरकारने गेल्या वर्षी सहा महिने लोकल बंद ठेवली होती. त्यामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. तेव्हा लोकल प्रवासांवर निर्बंध घातल्यामुळे प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शंभर रुपयांचा दररोज व्यवसाय सुद्धा होत नाही आहे. त्यात रेल्वेला एक हजार रुपये भाडे प्रति महिना द्यावे लागत आहे. मुंबई शहरातील कार्पोरेट कार्यालय सुद्धा गेल्या एका वर्षांपासून वर्क फॉर्म होम आहेत. परिणामी आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. इतकेच नव्हेतर मुलींच्या लग्नासाठी आणि कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्जाचे ओझे झाले आहे.
शासनाने आर्थिक मदत करावी
गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाऊन आणि कोरोनामुळे बूट पॉलिश कामगारांचे मोठे नुकसान झाले असून कर्जबाजारी झाले आहे. यंदा शासनाने फेरीवाल्यांना 1 हजार 500 आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा शासनाने आर्थिक मदत करावी, जेणेकरून आम्हाला आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या संकट काळात करता येईल. अशी भावनाही बूट पॉलिश करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- शाब्बास रे पठ्ठ्या!!! वर्षभरापासून कोरोना योद्ध्यांना विनामूल्य रिक्षा सेवा