मुंबई - लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सण साजरे करण्यावर बंधने आली आहेत. गणेशोत्सवही याला अपवाद नाही. मूर्तींच्या उंचीवर देखील निर्बंध आले आहेत. परिणामी मूर्तिशाळांचे स्वरुप पालटले आहे. उत्सवापूर्वी कार्यशाळेत दिसणाऱ्या उंच गणेश मूर्ती तयार होण्याचे चित्र दिसणे बंद झाले आहे. साधारण 4 फुटांच्या गणेश मूर्ती दिसत आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला आढावा...
यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. तसे आवाहनही सरकारने केले आहे. आगमन आणि विसर्जनाबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. पीओपी मूर्तींची मागणी घटली असून शाडूच्या मूर्तींचे बुकिंग मूर्तीशाळेत होत आहे. यासाठी नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली. मूर्तींची उंची देखील कमी करण्यात आलेली आहे. या बदलामुळे दरवर्षी मूर्तिकारांचा होणारा नफा मात्र कमी होणार आहे. उंच उंच मूर्तींची जागा आता लहान मूर्तींने घेतली आहे. तसेच शाडू मूर्ती, पेपर गणेशा, लाल मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींची मागणी वाढत आहे. या सर्वांचा विचार करता खर्चाचा ताळमेळ बसवताना गणेश मूर्तीकारांना कसरत करावी लागत आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. उंच गणेशमूर्तींची विक्री करताना चांगला नफा मिळत होता. यंदा बुकिंगही कमी मिळत आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे चाकरमानी मूळगावी परतला आहे. याचा परिणाम मूर्ती व्यवसायावर देखील झाला आहे.
यंदा मूर्तीशाळेचे वीजबील आणि घरभाडे तरी निघेल का? हा प्रश्न मूर्तीकारांना सतावत आहे. नवीन नियमावलीमुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मंडळाच्या उंच मूर्तींची जागा आता लहान मूर्ती घेणार आहेत. तसेच यावेळी शाडू, लाल माती अशा मूर्तींना जास्त मागणी आहे. किमती वाढल्या असल्या तरी लोकांकडे पैसे नाही. यामुळे नुकसान सहन करून मागील वर्षीच्या दरातच मूर्ती विकावी लागत आहे, अशी खंत सुनील आर्ट आणि वायकर बंधू मूर्तीशाळेचे प्रफुल्ल वायकर यांनी सांगितले.