मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रानेही या महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत गरजू लोकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. या संदर्भातील पत्र व्यवहार राज्य सरकारकडून करण्यात आल्याचे समजते.
भूकंप, मुसळधार पाऊस आणि पूर आल्यास नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केले जाते. तसेच या आपत्तीने बाधित लोकांना आर्थिक मदत दिली जाते. यासह आपण सर्वांनी एक नैसर्गिक आपत्ती म्हणून कोरोना महामारी असा या रोगाचा स्वीकार केला आहे. म्हणूनच, पंतप्रधानांकडे कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. ज्या लोकांच्या जीवनावर या नैसर्गिक आपत्तीचा, महामारीचा परिणाम झाला आहे. त्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पंतप्रधानांना पत्र देणार आहेत.
५ हजार ४०० कोटींचे पॅकेज....
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बुधवारी (ता.१४) रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. राज्य शासनाने या कठोर नियमांचे पालन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. लॉकडाऊन दरम्यान, अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व सेवा बंद राहणार असून. मात्र, सार्वजनिक वाहतूक जसे रेल्वे, बस या केवळ अत्यावश्यक सुविधेतील कर्मचार्यांसाठी लागू राहतील. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी ५ हजार ४६७ कोटी रुपयांचे लॉकडाऊन पॅकेज जाहीर केले. राज्यातील ७ कोटी नागरिकांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ महिनाभर मोफत दिले जाणार आहे. इतकेच नाही तर गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
असे असतील निर्बंध...
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
- रेल्वेसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार
- पेट्रोल- डिझेल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय
- हॉटेल- रेस्टॉरंट बंद ठेवले जाणार
- आवश्यक कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही
- रस्त्यावर खाद्यपदार्थ मिळतील, पण पॅकिंगमध्ये
- गरिबांना महिनाभर ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत
- शिवभोजन थाळी एक महिनाभर मोफत
- फेरीवाले, रिक्षाचालकांना १५०० रुपये मानधन
- कामगार, आदिवासी समाजाला मदत देणार
- ५४०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर
- १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये
हेही वाचा - महाराष्ट्रातील 361 नमुन्यांपैकी 61 टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन
हेही वाचा - लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद; मुंबईतील रस्ते ओस