मुंबई : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर गेला आहे. तसेच कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहचले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार टिम वर्कला प्राधान्य दिले जात आहे. रुग्ण आढळून येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे. 'चेस द व्हायरस' या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा शोध घेणे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण करणे. घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबीरांतून जास्तीतजास्त चाचण्या करत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे. रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा उपचार सुविधा निर्माण करणे. परिणामकारक असा औषधीसाठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा अनेक उपाययोजनांनी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणायला मदत झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने २२ जून रोजी मिशन झिरो अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३७ दिवस होता. हा कालावधी २ ते ३ आठवड्यांत ५० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितले होते. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १ जुलै २०२० रोजी ४२ दिवसांवर पोहोचला. तर, आज हा कालावधी ५१ दिवसांचा आहे. मुंबईत दररोज कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर १ जुलै २०२० रोजी १.६८ टक्के होता. हा दर काल १२ जुलै रोजी १.३६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. २२ जून रोजी मुंबईत उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे ५० टक्के होते. १ जुलैरोजी हे प्रमाण ५७ टक्के झाले. तर, काल १२ जुलैरोजी हा दर ७० टक्के झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
रुग्णालयातील खाटा रिक्त - मुंबईत समर्पित कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून २२ हजार ७५६ खाटा उपलब्ध आहेत. वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून रुग्णांना खाटा दिल्या जात असल्याने २२ हजार ७५६ खाटांपैकी १० हजार १३० खाटा रिकाम्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
चाचण्यांची संख्या वाढवली - महानगरपालिकेकडून कोरोनाच्या दिवसाला ४ हजार चाचण्या केल्या जात होत्या. डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय टेस्ट करता येतील असे पालिकेने जाहीर केल्याने आता या टेस्टची संख्या ६ हजारांपर्यंत वाढली आहे. मुंबई महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असल्याने सरासरी १ हजार ४०० रुग्ण आढळून यायचे प्रमाण आता १ हजार २०० पर्यंत खाली आले आहे. यातही लक्षणे नसलेल्या म्हणजे एसिम्प्टोमॅटिक प्रमाण सुमारे ८० टक्के आहे.