मुंबई - मुंबईसह राज्यातील बड्या शहरांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ होत आहे. इंजेक्शन न मिळाल्याने रुग्णांचे नातेवाईक चिंतेत आहेत. मात्र, रेमडेसिवीर औषध हे जीवरक्षक नाही. या औषधामुळे रुग्णांचा मृत्यू रोखता येत नाही, अशी माहिती राज्यातील कोरोनाविरोधी टास्क फोर्सने दिली आहे.
टास्क फोर्सचे प्रमुख संजय ओक म्हणाले…
कोरोना विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले, की 'रेमडेसिवीर हे व्हायरस विरोधी औषध आहे. हे व्हायरसला पसरण्यापासून रोखते. हे औषध रुग्णाला संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या ते नवव्या दिवसांच्यामध्ये देतात. दहाव्या दिवसांनंतर ते परिणामकारक नसते. या औषधांच्या सहा मात्रांनंतर औषध निरुपयोगी होते. हे जीवरक्षक नाही. रेमडेसिवीर औषध दिले नाही तर रुग्ण वाचणार नाही असे नाही. हे रुग्णांच्या नातेवाईकांनी लक्षात घेतले पाहिजे. कोरोना रुग्णाला बरे करण्यासाठी ऑक्सिजनसह इतर औषधोपचारांचाही उपयोग होतोय'.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या रोज वाढत आहे. त्यात रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करत आहेत. तर, ही परिस्थिती पाहता मेडिकल दुकानदार या इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हे इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट किंमतीने विकले जात असल्याचेही समोर आले आहे.