मुंबई - सीएसटीएम येथील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईमधील कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा आदी विभागातील १६ पुलांच्या दुरुस्तीसाठी देसाईला तब्बल १६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळेपुन्हा वाद निर्माण होणार आहे.
१४ मार्चला हिमालय पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. ‘हिमालय’ पूल कोसळून झालेली दुर्घटना ‘बनावट’ स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडली असून यात ६ जणांना नाहक जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर दोषी कंपनीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भक्कम पुराव्याच्या आधारे कंपनीचा ऑडिटर निरजकुमार देसाई याला दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली आहे.
चुकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळे हिमालय पूल दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचा निर्णयप्रशासनाने घेतला आहे.हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आणि पॅनलवरुन हकालपट्टी करण्यात आले आहे. असे असताना पालिकेने ए, बी, सी, डी आणि ई विभागातील पुलांची आणि भुयारी मार्गाची किरकोळ दुरुस्तीसाठी डी. डी. देसाईचा सल्ला घेतला आहे. या पार्श्वभूमीवरकुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा या वर्दळीच्या भागातील १६ पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी ८६ लाख, ४० हजार ८९ रुपये खर्च केले जाणार आहेत.
हिमालय पुल दुर्घटनेनंतर देसाईने केलेल्याइतर पुलांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे असताना मुंबईतील पुलांच्या आणि भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठीचा सल्ला पुन्हा डी.डी. देसाईला घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रस्तावावर येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणाऱया जोरदार वाद रंगण्याची शक्यता आहे.
या पुलांच्या दुरुस्तीसाठी घेणार सल्ला -
- ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल
- ऑपेरा हाऊस पूल
- फ्रेंच पूल
-हाजीअली भुयारी मार्ग
- फॉकलॅन्ड रोड (डायनाब्रिज)
- प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल
- चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग
- सीएसटी भुयारी मार्ग
- ग्लोरिया चर्च उड्डाणपूल
- सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल
-ईस्टर्न फ्रीवे
- एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल
- वाय. एम. उड्डाणपूल
- सर पी डिमेलो पादचारी पूल
-डॉकयार्ड रोड पादचारी पूल
- चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग