मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील कोरोना संदर्भात अपडेट आणि माहिती उपलब्ध होणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा त्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
हेही वाचा - सॅनिटायझरची खरेदी करण्याकरता 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार १ हजार रुपये
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना शासकीय यंत्रणांना सहकार्य, सहयोग करण्याची इच्छा असते, त्यांनी ccrmaharashtra.aid@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायांच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर त्यांनी ccrmaharashtra.ind@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन कोरोना नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित शंकांचे निरसन कुणाला करावयाचे असल्यास त्यांनी ccrmaharashtra.ind@gmail.com या ई-मेलवर तर शासनाने दिलेल्या निर्देशांबद्दल, आखलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टीकरण हवे असल्यास ccrmaharashtra.policy@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन या कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.