मुंबई - भारत-चीन संघर्षानंतर भारतात चिनी वस्तू आणि चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकला जात आहे. तर आता बांधकाम क्षेत्राकडूनही चिनी वस्तू, यंत्र-सामग्री आणि कच्चा माल यावर बहिष्कार घातला जाणार आहे. कारण देशातील बांधकाम व्यवसायातील आघाडीच्या क्रेडाय नॅशनलने सर्व सदस्यांना यासंबंधीचे आवाहन केले आहे.
बांधकाम क्षेत्र हे देशातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक महसूल देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रावर इतर 250 उद्योग अवलंबून आहेत. या क्षेत्रात मोठ्या संख्येने चिनी कच्चा माल आणि यंत्रसामग्री वापरली जाते, तर कंत्राटदार म्हणूनही चिनी कंपन्या या क्षेत्रात काम करतात. आता मात्र लवकरच हे प्रमाण कमी वा हद्दपार होण्याची शक्यता आहे.
चीनने जगाला कोरोनाच्या महामारीत अडकवले असून आता भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. भारतीय सैन्य चीनला प्रत्युत्तर देत आहेच, तर दुसरीकडे भारतीयांनीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत त्यांना दणका देण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर आता बांधकाम क्षेत्रानेही चिनी वस्तूंवर अवलंबून राहू नका, असे आवाहन केले आहे. क्रेडायचे अध्यक्ष सतीश मगर यांनी सर्व सदस्यांना चिनी कच्चा माल वा इतर वस्तू वापरू नये. अधिकाधिक स्वदेशी वस्तू वापराव्यात, असे आवाहन केले आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत 250 उद्योगांनीही स्वदेशीचा अवलंब करावा, असेही मगर म्हणाले.