मुंबई - लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असलेल्या कामगारांवर बिकट परिस्थिती आली आहे. खायला मिळत नाही, खिशात पैसे नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. ज्या महिला दुसऱ्यांकडे घरकाम करतात त्याही सध्या घरीच आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांना एक वेळच्या जेवणापेक्षा आर्थिक मदत व्हावी, या हेतूने कनेक्ट या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.
एका कंपनीच्या माध्यमातून 500 कुटुंबांना पाच हजार रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांना जेवणाची सोय करून दिली जात आहे. परंतु, जे दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना दररोज रांगेत उभा राहायला लावणे योग्य वाटत नाही. यामुळे अशा कुटुंबांना आर्थिक मदत हवी या हेतूने कनेक्ट ही सामाजिक संस्था डोर्फ केटल या कंपनीच्या सीएसआर फंडातून 500 कुटूंबाना मदत करणार आहे. लॉकडाऊन मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे दिवस कसे काढायचे, असा प्रश्न मोलमजुरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या कामगारांसमोर आहे.
गरजू कुटुंबांना मदत व्हावी यासाठी केटल या कंपनीच्या माध्यमातून पाचशे कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये सलग तीन महीने देण्यात येणार आहेत. यातून या कुटुंबांना आर्थिक मदत होणार आहे. लोकांना या योजनेची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत आहोत याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपली माहिती आम्हाला पाठवलेली आहे. भोजनदान हे तात्पुरते कमी वेळाकरता असू शकते. सतत रांगेत उभे राहुन खिचडी पुलाव घेणे हे दु:खद व स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारे आहे. बॅक खात्यात पैसे येणे, हे सकारात्मक व लोकांना जे आवश्यक तेच खरेदी करण्याचे बळ देते. इतरही कंपन्यांनी हा आदर्श घ्यावा, असे कनेक्ट संस्थेचे राजेश इंगळे यांनी सांगितले.