मुंबई: महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांमध्ये तत्कालीन सरकारने बोटचेपी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी तर बेळगाव केंद्रशासित करा त्यानंतर येणारा न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या प्रश्नात बोलू नये, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली आहे.
कन्नड रक्षण वेदीकेला काँग्रेसचा पाठिंबा: सीमा प्रश्न अत्यंत आक्रमक भूमिका घेणारी कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिका ही संघटना काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्षेच्या पाठिंब्यावर काम करत आहे, असा आरोप उपाध्ये यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आमची भूमिका आरे ला का रे करण्याचीच आहे. मात्र, काँग्रेसने आपली भूमिका तपासून बघण्याची गरज आहे, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला आहे.
17 डिसेंबर चा मोर्चा नैराश्यातून: 17 डिसेंबरला महाविकास आघाडीने मुंबई सरकार विरोधी मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र हा मोर्चा जनतेच्या प्रश्नांसाठी नाही तर केवळ सत्ता मिळवण्यासाठी आलेल्या नैराश्यातून काढण्यात आलेला आहे. राज्यपालांना हटवण्याबाबत आम्ही यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही. केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल.
महाविकास आघाडी सरकार: मात्र महाविकास आघाडीने यापूर्वी राज्यातील जनतेचा किती वेळा अपमान केला आहे. हे एकदा मोर्चा आधी स्पष्ट करावे. कोरोनामध्ये सर्वाधिक बळी हे महाराष्ट्रात गेले आहेत, त्याचे उत्तर महाविकास आघाडी सरकार देणार का? महाराष्ट्रातील जनतेला आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या माविआ जनतेचा अपमान केला नाही का? असा सवालही यावेळी उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.