मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत लसींबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका लोकशाहीला मारक आहे. संपूर्ण खोटी माहिती असून ती सध्याच्या महामारीत देशाच्या आत्म्याला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाला रोखण्यात आणि लसीकरणात भाजपा सरकार पूर्णतः अपयशी ठरला आहे. जागतिक स्तरावरही देशाची प्रतिमा हास्यास्पद झाली असून भाजपा सरकारचा खरा चेहरा समोर आला, अशी जोरदार टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली.
'हे तर जागतिक पप्पू'
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने याचिका दाखल केली आहे. ती लोकशाहीला मारक ठरणारी आहे. न्यायालयाला काही समजत नसल्याची भाजपा नेत्यांची भावना आहे. कोरोनाच्या महामारीत देशाच्या आत्म्याला संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहेत. मुळात संविधान न मानणारे हे सरकार आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली असून सरकारचा कारभार जागतिक पातळीवर हास्यास्पद ठरत आहेत, असे पटोले म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही त्यांनी समाचार घेतला. दरम्यान, मोदी हेच जागतिक पप्पू असल्याचे ते म्हणाले.
'मोदी सरकार अपयशी'
देशातील नागरिकांना मोफत लस देणार असल्याचे मोदी सरकारने खोटी आश्वासन दिली आहेत. उलट कॉंग्रेसने अनेक लसी आतापर्यंत मोफत दिल्या. कधीही गाजावाजा केला नाही. मात्र, भाजपा ढोल बडवत सुटले आहे. लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे लसी मिळत नाहीत, तर सेंट्रल व्हिस्टावर २० हजार कोटी खर्च केले जात आहेत. तर लसीकरणावर मात्र केवळ ३५ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. कोरोना रोखण्यात आणि लसीकरणाबाबत मोदी अपयशी ठरले आहेत. नरेंद्र मोदींनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.
'सामना कसा करायचा ते ठरवू'
देशात कोरोनाची महामारी सुरु आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. भाजपाचे जे.पी. नड्डा यांनी गांधी घराण्यावर टीका केली. यावरुन पटोले यांनी भाजपावर सडकून टीका केली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका करत आहे. परंतु, हे किती दिवस चालणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेना खासदार यांचाही त्यांनी समाचार घेतला. स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे 'सामना' कसा करायचा तो आम्ही ठरवू, असे पटोले म्हणाले.