मुंबई - पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे यांच्यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणे कशाप्रकारे तपास केला हे सांगण्याचा प्रयत्न केला. या यंत्रणेने तपास केला नसता तर या सर्व बाबी बाहेर आल्या नसत्या, अशा प्रकारचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र, एवढी मुद्देसूद माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कशी? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस या गुन्ह्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन बोलत आहेत, त्यामुळे असे वाटते की, हा गुन्हा घडताना देवेंद्र फडणवीस हे खुद्द त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची तपास यंत्रणा तयार करायला हरकत नाही, अशा प्रकारचा टोला सचिन सावंत यांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणीस यांच्या या ज्ञानाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून घेत, त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख केले पाहिजे, असा चिमटाही काढला.
प्रकरणामागे महाविकास आघाडीचे नेते कोण?
दिल्लीमध्ये आपल्या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणीस यांनी महाविकास आघाडीवर थेट आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना पाठीशी घालण्याचा पूर्ण प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे केवळ सचिन वाझे यांना अटक करून किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांची बदली करून हे प्रकरण थांबणार नाही. तर या प्रकरणामागे महाविकास आघाडीचे नेते कोण आहेत? हे शोधून काढले पाहिजे असा इशारा त्यांनी दिला.