मुंबई - राज्यामध्ये आपण बघतो आहोत की विरोधी पक्षाकडून कोणत्याही विषयावरून राजकारण केले जात आहे. मात्र, महापालिकेत विरोधी पक्षात असलेली काँग्रेस विरोधाला विरोध न करता मुंबईकरांच्या विकासाला साथ देत आहे. मुंबईचा विकास आणि मुंबईसाठी आपण एकत्र असणे गरजेचे, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला पालिका निवडणुकीत सोबत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, काँग्रेसने आधीच स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे, असे सांगत महापौरांचा आवाहनाला नकार दर्शवला आहे.
मुंबईसाठी एकत्र असले पाहिजे
मुंबई महापालिकेच्या वतीने विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रयत्नाने विशेष निधीतून 'एफ उत्तर' विभागातील प्रभाग क्र. 176 मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक आणि टॅब वाटप करण्याचा कार्यक्रम गुरुनानक हायस्कूल, सायन कोळीवाडा येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री महापौर वर्षा गायकवाड, महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना महापौरांनी भाजपचा समाचार घेतला. भाजपकडून कोणत्याही विषयावर विरोध केला जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेत रवी राजा यांच्यासारखे विरोधी पक्ष नेते आहेत. ते मुंबईच्या विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला साथ देतात आणि जिथे चुकीचे आहे तिथे चुकीचे आहे म्हणतात. पालिका आयुक्तांकडे किंवा प्रशासनाकडे एखादा विषय मांडताना ते योग्य प्रकारे मांडतात. यामुळे मुंबईच्या विकासासाठी आपण एकत्र असले पाहिजे, असे आवाहन महापौरांनी केले.
नोकरी देणारे बना
आमच्यावेळी खेळ होते, खेळामध्ये प्राविण्य असायचे. आता विद्यार्थी ऍडव्हान्स झाले आहेत. या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत आहेत. लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांचे कणा बनत आहेत. विद्यार्थ्यांनी या टॅब आणि लॅपटॉपच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणातून तुम्ही सक्षम व्हाल तेव्हा आपल्या बाजूच्या दोन जणांना मदतीचा हात द्या, असे झाल्यास शिकणापासून कोणीही वंचित राहणार नाही. नोकरी करणारे नका, नोकरी देणारे बना. स्वतःचे व्यवसाय उभे करा, असा सल्ला महापौरांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षण मंत्र्यांकडून पालिकेचे कौतुक
राज्यात गेले दीड वर्षे कोरोनाची लाटा आहे. सध्या तिसरी लाट, डेल्टा प्लसची चर्चा सुरू आहे. आमच्यासाठी राज्यातील नागरिक महत्वाचे आहेत. त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत. ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू केल्या आहेत. मुंबई आणि इतर ठिकाणी शाळा कधी सुरू होईल माहीत नाही. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे मूल आता टेक्नोसॅव्ही झाली आहेत. सरकारही आता त्या प्रमाणे काम करत आहे. पालिकेने शिक्षणाबाबत जो निर्णय घेतला त्याचे कौतुक केले पाहिजे. देशाचे भविष्य आणि संपत्ती मुले आहेत. त्यांना मदत केली पाहिजे, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये
मी आणि किशोरी पेडणेकर मीडियामध्ये एकमेकांच्या विरोधात डिबेट करत होतो. डिबेटनंतर आमही एकमेकांचा तितकाच आदरही करतो. इतिहास बदलता येत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम होऊ शकत नाही. यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये, असे भाजपचे नाव न घेता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.
कायद्याचा अभ्यास करून नागरिकांना सुविधा द्या
गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करता यावी म्हणून लॅपटॉप आणि टॅबचे वाटप करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून घेतली. पालिकेने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले त्याची छाननी केली आणि आज त्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅबचे वाटप केले जात आहे. माझ्यानंतर पालिकेतील 50 नगरसेवकांनी यासाठी तरतूद केली आहे. ही चांगली बाब आहे. नगरसेवकांनी पालिका कायद्यांचा अभ्यास करून लोकांना सुविधा देण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले.
महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर
महापौरांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आवाहनाबाबत पत्रकारांनी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांना विचारले असता. भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हाच मुंबई महापालिकेच्या 227 जागा स्वबळावळ लढऊ, असे स्पष्ट केले आहे. त्यात अद्याप काही बदल झालेला नाही, असे सांगत रवी राजा यांनी महापौरांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही.
हेही वाचा - महापालिका करणार अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण