मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज मुंबईतील टिळक येथे सुरू झाली आहे. या बैठकीत निवडणुकीचा आढावा आणि दुष्काळावर चर्चा होणार आहे. तसेच लवकरच येत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे चित्र काय असेल त्या संदर्भात प्राथमिक चर्चा होणार आहे. त्यासाठीचा एक अहवाल केंद्रीय समितीकडे पाठवला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते आहे.
या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.
या बैठकीच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या व काँग्रेसच्या विरोधात प्रचार करणाऱ्या अनेक नेत्यांच्या संदर्भात चर्चा होणार आहे. त्यासंदर्भात काय कारवाई केली जाईल याविषयीही अनेक नेते बोलणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून प्राथमिक स्वरूपाच्या तयारी संदर्भात चर्चा होणार असून, अखेरच्या सत्रात राज्यात पडलेल्या दुष्काळावर चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यभरात काँग्रेसचे दौरे निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.