मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी सरकारच्यावतीने नवीन नियम लावण्यात आले आहेत. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. मात्र, राज्यात लॉकडाऊन लावण्याला केवळ विरोधी पक्षच नव्हे तर, सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडूनही विरोध होत आहे. सरकारने लॉकडाऊन लावू नये, या मागणीसाठी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी श्रीजी हॉटेलसमोर आंदोलन केले.
काय म्हणाले निरुपम?
लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेले आहेत. तर काहींचे व्यवसायदेखील ठप्प झाले आहेत. त्यातून कुठेतरी सावरत असताना पुन्हा एकदा सरकारच्यावतीने रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. याचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यवसायिकांना बसत आहे. या हॉटेल चालकांनी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली श्रीजी हॉटेल, अंधेरी बाहेर एकत्र येऊन सरकारचा निषेध नोंदवला. व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक संकटात जावे लागेल असे निर्णय सरकारने घेऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिक 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या अंतर्गत काळजी घेऊन वावरत आहेत. वाटल्यास नियम कठोर करा, पण लॉकडाऊन लावू नका, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने परभणी जिल्ह्यातील संचारबंदीत वाढ