मुंबई - अयोध्येमध्ये मंदिर निर्माण करण्यात ज्यांचे योगदान नाही, असे लोक अयोध्येला जाण्याची घोषणा करतात. तीर्थयात्री म्हणून अयोध्येला कोणीही जाऊ शकतो. मात्र, ज्यांनी मंदिरासाठी एक विटही रचली नाही, असे लोक अयोध्येला जाणार आहेत, असा टोला काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सेनेला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. तेथे ते रामलल्लाचे दर्शन घेऊन शरयू आरतीही करणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली होती. तसेच राम मंदिराचा मुद्दा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचे राऊत म्हणाले होते. त्यावरूनच आज संजय निरुपम बोलत होते.
तसेच संजय निरुपम यांनी यावेळी मनसेला देखील धारेवर धरले. मनसे कोणाच्या विरोधात आहे आणि कोणाच्या समर्थनार्थ हेच कळत नाही. लोकांना पक्ष बदलताना पाहिले. मात्र, पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाला विचारधारा बदलताना पाहिल्याचे, निरुपम म्हणाले. तसेच त्यांनी मनसेच्या हिंदूत्ववादाच्या मुद्द्यावर टीका केली.