मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने मोर्चा बांधणी केली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दलित मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दलित महिला चेहरा म्हणून वर्षा गायकवाड यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली असल्याचे बोललो जात आहे. काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नुकतीच वर्षा गायकवाड यांची निवड केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उभारी येईल का याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार : महाविकास आघाडीतील माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या निवडीमुळे येणाऱ्या मुंबई महापालिका, मुंबईशी निगडित विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस असे यश प्राप्त होईल असा मला विश्वास आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेसमधील संघटनात्मक अनुभव त्यासोबतच महाविकास आघाडीतील मंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात केलेले काम या सर्वांचा समतोल साधून ते त्यांच्या पदाला साजेसे कार्य करतील.
काँग्रेसचे आमदार माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड या चांगल्या प्रकारे काम करतील आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणतील -काकासाहेब कुलकर्णी, काँग्रेस प्रवक्ता
42 नगरसेवक निवडून येणार : इतिहासात प्रथमच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी दलित महिला चेहरा देण्यात आला आहे. काँग्रेसने मराठा कार्ड वापरत यापूर्वी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. त्यांच्या कार्यकाळात मात्र, ते फेल झाले. मराठा चेहरा, कामगार नेता असूनही ते सर्व प्रकारे अपयशी ठरले. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आर्थिक गणित बसवावी लागतात. आर्थिक रसत कोण उभा करतो ती जबाबदारी मुंबई अध्यक्षकडे असतात. भाई जगताप अशाप्रकारे सगळ्याच कार्यक्रम आघाड्यावरती अपयशी ठरले.
ठाकरे यांचे सौम्य हिंदुत्व : राज्यातील अँटी मोदी फॅक्टर ज्यात दलित मुस्लिम ख्रिश्चन आहे हा सगळा समाज उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचे सौम्य हिंदुत्व मुस्लिम समाजाने देखील मान्य केले आहे. वज्रमुठ सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला मुस्लिम समाजाची गर्दी पाहायला मिळाली. काँग्रेसचा विजय हा दलित मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यावर आला आहे. काँग्रेसला एक भीती आहे आपला पारंपारिक दलित मतदार आहे तो आपल्यापासून दूर जायला नको. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी दलित, महिला चेहरा म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. यामुळे एक चांगला संदेश महिला आणि दलित समाजात गेला आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत 29 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. यावेळी काँग्रेसला वातावरण चांगले आहे. याचा फायदा निश्चितच मुंबई काँग्रेसला मिळणार आहे. उभी फूट पडल्यामुळे शिंदे गट वेगळा झाला आहे. या कारणामुळे काँग्रेसला मोठी स्पेस सध्या मुंबई महापालिका निवडणुकीत मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 42 नगरसेवक निवडून येऊ शकतात. राजकीय वारसा लाभल्यामुळे वर्षा गायकवाड यांचा फायदा निश्चितच काँग्रेसला होणार - राजकीय विश्लेषक विवेक भावसार
पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाला दलित महिला चेहरा देऊन काँग्रेसने एका दगडात दोन निशाणा साधला आहे. आजवर अनेक वेळा मुंबई काँग्रेसमध्ये अनेकदा गटबाजी पाहायला मिळाली. मुंबई काँग्रेसने त्याला शह देण्यासाठी पहिली महिला अध्यक्षा देऊन अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. गायकवाड या दलित चेहरा असल्याने दलित, मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात वर्षा गायकवाड मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे किती नगरसेवक निवडून आणतात येणारा काळच ठरवेल.