मुंबई Ashish Shelar criticizes Congress : झारखंडमध्ये काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमधून दोनशे कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यावरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. भ्रष्टाचार, दलाली, लूटमार, कमिशन, लाचखोरीच्या इतिहासानं काँग्रेस उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी म्हटंल आहे. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेनं आता काँग्रेसचे काळे कारभार उघडकीस आहे आहेत. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचं समीकरण झालं आहे, तर दुसरीकडं मोदी भ्रष्टाचार निर्मूलनाची हमी देत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं आशिष शेलार म्हणाले. ते आज मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गांधी करप्शन सेंटर : यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, झारखंडमधील काँग्रेसच्या खासदाराच्या घरात कोट्यवधींची रोकड सापडली असेल, तर काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरात किती संपत्ती आहे, याचा हिशेब जनतेनं करावा. तसंच जिथं काँग्रेसचा लोकप्रतिनिधी असेल, तिथे भ्रष्टाचाराची हमी असते,जिथं भाजपाचा प्रतिनिधी असेल तिथं स्वच्छ कारभाराची हमी असते, असं शेलार म्हणाले. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ज्या केंद्रातून भ्रष्टाचाराचं प्रशिक्षण मिळतं ते केंद्र आता देशाला ज्ञात झालं आहे. त्या केंद्राचं नाव गांधी भ्रष्टाचार केंद्र ठेवावं, असा उपरोधिक टोलाही शेलार काँग्रेसला लगावाला आहे.
सोरेन यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही : आता सर्व भ्रष्ट नेते भारत आघाडीच्या नावानं एकत्र आले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराचं एकामागून एक भांडं फुटत आहे. त्यामुळं सर्वजण ईडी, आयटी, सीबीआयच्या नावानं रडायला लागले आहेत. झारखंडमधील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा एवढा मोठा घोटाळा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या डोळ्यासमोर घडला, त्यामुळं सोरेन यांना सत्तेत राहण्याचा काही अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रातही मद्याचे घबाड? : दिल्लीत केजरीवाल सरकारचा दारू घोटाळा उघड झाला असून काँग्रेस नेत्याचा दारू घोटाळाही उघडकीस आल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात अशाच प्रकारे मद्यविक्रीचे परवाने देण्यात आले. त्याचप्रमाणे किराणा दुकानात मद्यविक्रीला परवानगी देण्याचा प्रयत्न झाला. कोरोना होता, तेव्हा मंदिरं बंद होती. मात्र, पब सुरू होते. त्यामुळं आधी आम आदमी, आता काँग्रेस नंतर महाराष्ट्रात असं मद्य घबाड उघड होईल अशी शंका शेलार यांनी उपस्थित केली आहे.
हेही वाचा -