मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणाऱ्या वादग्रस्त पुस्तकासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करुन अशी तुलना करणे चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी काँग्रेसने मुंबईत टिळक भवन येथे या विरोधातील पुकारलेले आंदोलन मागे घेत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगीतले.
हेही वाचा - 'लेखक-प्रकाशकाने पुस्तक मागे घेतले'... जावडेकरांची सारवासारव
थोरात म्हणाले, 'छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्याने आम्ही आंदोलन रद्द करत आहोत. भाजपच्या एका नेत्याने माफी मागून चालणार नाही ही माफी भाजपाच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने मागावी.' अशी मागणीही त्यांनी केली.
वादग्रस्त पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर राज्यातील जनतेमध्ये याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानतो आणि जनतेने रोष केलेला व्यक्त लक्षात घेऊनच भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून हे पुस्तक मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळेच आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत असेही थोरात म्हणाले. मात्र असा प्रकार यानंतर घडू नये, यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
देशातील महागाई संदर्भात थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्थाही कठीण अवस्थेमध्ये जात आहेत कारखाने बंद पडत आहेत. अनेक रोजगार संपले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था नीट चालवली होती. परंतु, आता सर्वसामान्यांनाही जीवन जगणे कठीण झाले आहे. याच गोष्टीवरून देशातील जनतेचे लक्ष वळवण्यासाठी भाजपचे लोक धार्मिक मुद्दे समोर आणत आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करत असल्याचेही थोरात म्हणाले.
हेही वाचा - 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध