मुंबई - विधानसभेचा निकाल लागून 20 दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नाही. शिवसेनेबरोबर जायचे की नाही याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज दिल्लीत आले आहेत. त्यामुळे आज राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी सुटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
2 दिवस दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका होणार असून, या बैठकांमध्ये राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फुटली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे होणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅराथॉन बैठकांसाठी काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत पोहोचले आहेत. काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जून खर्गे दिल्लीतच आहेत. तर राष्टरवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक दिल्लीतील बैठकीसाठी जाणार आहेत. त्यातच दिल्लीत लोकसभेचे हिवाळी अधिवेशन चालु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे दिल्लीत आहेत. काँग्रेसकडून काँग्रेस महासचिव वेणुगोपाल रेड्डी आणि सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव अहमद पटेल यांची सत्तास्थापनेत मोठी भूमिका असणार आहे.
सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात एक बैठक झाली असली तरी आज दुसरी एक बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेचा अंतीम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या सोनिया गांधी व शरद पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेत एक-दोन दिवसात महाराष्ट्राबाबत पुढील निर्णय घेण्याचे निश्चित झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सकाळी मुंबईत असले तरी दुपारनंतर तेही दिल्लीला जाणार आहेत.त्यामुळे आज आणि उद्या होणाऱ्या मॅराथॉन बैठकांमध्ये राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.