मुंबई - देशात नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना 3 जानेवारीपर्यंत हे संकट महाराष्ट्रापासून दूर होते. पण मात्र आता हे संकट महाराष्ट्रावर ओढावले आहे. सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) पुणे यांच्याकडून आज 8 रुग्णांच्या नव्या स्ट्रेनचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे रोग सर्व्हेक्षण अधिकारी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. यात मुंबईतील 5 तर पुणे, मिरारोड आणि ठाण्यातील प्रत्येकी 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. तेव्हा आता मुंबईसह राज्यातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे.
आतापर्यंत राज्यातील 3390 प्रवाशांची कोरोना चाचणी -
ब्रिटनमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनने थैमान घातल्यानंतर 22 डिसेंबरपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानची विमानसेवा बंद करत 22 डिसेंबरच्या आधी (28 दिवस) आणि 23 डिसेंबरपर्यंत आलेल्या प्रवाशांना विलगिकरणात ठेवण्यात येत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही शोधत त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तर युरोपातून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही हेच धोरण अवलंबण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात 4836 प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील 822 जण 28 दिवस पूर्ण केलेले आहेत. तर यातील 3390 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 72 जण कोरोना पॉझिटीव्ह -
ब्रिटन आणि युरोपातून आलेल्या तसेच कोरोना चाचणी केलेल्या 3390 पैकी 72 जण पॉझिटिव्ह आले आहेत. या पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 495 जणांचा शोध घेण्यात आला आहे. तर यातील 293 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या पैकी 30 जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
अखेर नव्या स्ट्रेनने गाठलेच -
पॉझिटीव्ह आलेल्या 72 पैकी 68 जणांचे नमुने नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आतापर्यंत 24 अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे महाराष्ट्र नव्या कोरोनापासून दूर असल्याची समाधानकारक बाब होती. पण आज सोमवारी मात्र राज्यात नव्या स्ट्रेनचा शिरकाव झालाच. आज एनआयव्हीकडून राज्यातील 8 रुग्णांच्या नव्या स्ट्रेनचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती सरकारला आयसीएमआरकडून कळवण्यात आले. यामुळे आता नक्कीच राज्याची चिंता वाढली आहे. आता आरोग्य यंत्रणासमोर या नव्या स्ट्रेनला रोखण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, 72 पैकी 68 नमुने एनआयव्हकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर आता लवकरच आणखी 4 नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात येणार असल्याचे ही डॉ. आवटे यांनी सांगितले आहे.
मुंबईकरांनो काळजी घ्या! -
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. तर मृत्यू दरही कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईकर थोडे बेफिकीर वागताना दिसत आहेत. पण आता मात्र मुंबईकरांनी बेफिकीरपणा सोडून जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण 70 टक्के वेगाने पसरणारा नवा स्ट्रेन अखेर मुंबईत दाखल झाला आहे. राज्यात आढळलेल्या नव्या स्ट्रेनच्या 8 रुग्णांपैकी 5 रुग्ण हे एकट्या मुंबईतले आहेत. तर 1 ठाण्यातील, 1 पुण्यातील आणि 1 मीरारोडमधील आहे. दरम्यान या सर्व 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - कंगनाच्या आडून भाजपचे कुटिल कारस्थान उघड - सचिन सावंत