मुंबई : महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडसाठी प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी असा २ किलोमीटरचा बोगदा खाणला जात आहे. त्यापैकी १ किलोमीटर बोगदा खणण्याचे काम पूर्ण झाले आहे. जानेवारीपर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.
कोस्टल रोड प्रकल्प -
मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात दहिसरपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी सुमारे तीन तासाचा अवधी लागतो. हा अवधी कमी करण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प उभारला जात आहे. 13 हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जात आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंत १०.५ किलोमीटरच्या कामात २ किलोमीटरचे दोन बोगदे असणार आहेत. हे बोगदे खणण्याचे काम मावळा या टनेल बोअरिंग मशीनद्वारे केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला होता.
कसे असतील बोगदे?
बोगदे खाणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे मावळा ही टीबीएम म्हणजेच 'टनेल बोरिंग मशीन' वापरण्यात येत आहे. ही टीबीएम मशीन ४ मजली इमारती एवढी उंच आहे. तिची लांबी तब्बल ८० मीटर एवढी आहे. या मशीनची पाती प्रत्येक मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरू शकणारी आहे. 'मावळा' या संयंत्राचे प्रत्यक्ष प्रचलन हे संगणकीय पद्धतीने होते. तर, 'मावळा' या संयंत्राची उर्जा क्षमता ही ७ हजार २८० किलोवॅट एवढी आहे. प्रकल्प कालावधी दरम्यान दररोज सरासरी ८ मीटर बोगदा खणला जाईल, अशी अपेक्षा आहे.
एका बोगद्यासाठी ९ महिन्याचा कालावधी
दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी, अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत. दोन्ही महाबोगदे खाणण्यासाठी प्रत्येकी साधारणपणे ९ महिने लागणार आहेत. दोन्ही बोगद्यांसाठी २ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी जमेस धरण्यात आला आहे. यानुसार महाबोगदे खाणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
पाण्याचा पुनर्वापर
मावळा या संयंत्राद्वारे बाहेर टाकण्यात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा यासाठी 'प्रक्रिया केंद्र' देखील प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तर खोदकामातून निघणारे खडक व खडी याचा उपयोग भराव कामासाठी करण्यात येणार आहे.