मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपले कार्यालय थाटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील हे कार्यालय म्हणजे महापालिकेच्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचा आरोप आमदार वर्षा गायकवाड यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे सभागृहात उपस्थित केला. आमदार सुनील केदार, आमदार नाना पटोले, तसेच यशोमती ठाकूर यांनी याबाबत सरकारला चांगलेच धारेवर धरले. मात्र, यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे सांगितले.
कार्यालय समन्वयासाठी : ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पालकमंत्री म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात कार्यालय सुरू करणे योग्यच आहे. पावसाच्या स्थितीत आणि अन्य विकास कामांच्या संदर्भात समन्वयासाठी अशा पद्धतीचे कार्यालय असणे गरजेचे आहे. यात कोणतेही गैर नाही. विरोधकांनी याचे राजकारण करू नये, असेही त्यांनी यावेळी विरोधकांना सुनावले. पालकमंत्र्यांना जिथे वाटेल त्या ठिकाणी कार्यालय थाटू शकतात. मग ते पालिकेचे मुख्यालय असो, अथवा अन्य एखादे कार्यालय असो. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये, असेही विखे पाटील यावेळेस म्हणाले.
विरोधकांनी केला सभात्याग : विखे पाटील यांच्या या उत्तरावर विरोधक अतिशय संतापले. त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या या कृतीचा आपण तीव्र शब्दात निषेध करीत आहोत अशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे म्हणत विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा देत सभात्याग केला.