मुंबई : कलाकारांचा एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश होणे हे नवीन नाही व आता तर निवडणुकीच्या तोंडावर हे सत्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहे. अशातच सध्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक वर असलेली महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील कलाकार प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रभाकर मोरे यांच्यावर कोकण विभागाची, चित्रपट, कला, सांस्कृतिक अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संस्कृती अध्यक्षपदाची जबाबदारी : महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेद्वारे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले हास्यविर प्रभाकर मोरे यांनी आज विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अजित पवार यांनी प्रभाकर मोरे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्याकडे कोकण विभागाची चित्रपट, कला, संस्कृतिक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. प्रभाकर मोरे हे मुळता कोकणातील रत्नागिरी, चिपळूण येथील असल्याने त्यांना कोकणची बरीच जाण असून या त्यांच्या प्रवेशाने कोकणामध्ये चित्रपट, कला, संस्कृती वाढवण्यास त्यांच नक्कीच सहकार्य लाभेल असेही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
कलाकारांचे पवारांसोबत संबंध : याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्राला न्याय दिला. समाजातील या महत्त्वाच्या घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यांचे अनुकरण करुन शरद पवारांनी पुढे हे कार्य चालू ठेवले. मच्छिंद्र कांबळी असतील किंवा इतर कलाकार असतील या सर्वांचे पवार साहेबांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
विनोदी अभिनेते : मीसुद्धा सरकारमध्ये असताना दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या माध्यमातून अनेक फेस्टिवल महाराष्ट्रामध्ये आयोजित केले आहेत, असेही अजित पवार म्हणाले. प्रभाकर मोरे यांच्या विषयी सांगताना अजित पवार म्हणाले की, प्रभाकर मोरे हे मूळचे चिपळूणचे आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्ये लोकांना हसवण्याचे काम केले आहे. मी त्यांचं मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो. तसंच त्यांच्याकडे कोकण विभागाची चित्रपट, कला, संस्कृती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे असेही अजित पवार म्हणाले.
कोण आहेत प्रभाकर मोरे? : प्रभाकर मोरे हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते आहेत. मराठी नाटक, चित्रपट यासारख्या माध्यमातून ते लोकांचे मनोरंजन करत आले आहेत. प्रभाकर मोरे यांचा जन्म रत्नागिरीतील, चिपळूण येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल वहल मधून पूर्ण केलं. तसंच त्यांनी त्यांचं कॉलेजचे शिक्षण डी बी जे कॉलेज चिपळूण मधून पूर्ण केले. प्रभाकर मोरे यांनी करिअरची सुरुवात नाटकांपासून केली.
दिग्दर्शक : प्रसिद्ध डायरेक्टर, निर्माते, लेखक, अभिनेते संतोष पवार यांच्या नाटकांमध्ये प्रभाकर मोरे यांनी अभिनेता म्हणून काम केले आहे. तसेच प्रसाद खांडेकर लिखित नाटकांमध्येसुद्धा त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्रातील कॉमेडी अभिनयातील कलाकारांपैकी ते एक आहेत. त्यांनी आतापर्यंत खूप सार्या मराठी नाटकांमध्ये कॉमेडी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यासोबत ते एक डायरेक्टरसुद्धा आहेत. अभिनयाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला असून सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा, या कार्यक्रमामुळे ते जास्त चर्चेत आहेत.
हेही वाचा - MPSC New Pattern 2025 Onwards : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन पॅटर्न 2025 पासून लागू होणार