मुंबई- मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ४५ हजार ५०० अंतरावरील ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल आता इतिहास जमा होणार आहे. कारण आता हा जुना मोडकळीस आलेला पूल पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने(एमएसआरडीसी) हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार असून 14 एप्रिलपर्यंत हे काम चालणार आहे.
ब्रिटीशकालीन असा हा पूल जुना आणि धोकादायक झाल्याने तो पडण्यासाठी 2017 पासून एमएसआरडीसी प्रयत्नशील होते. मात्र, याला विरोध झाल्याने, हा वारसा जपण्याची मागणी होत असल्याने हा पूल पाडणे काही शक्य होत नव्हते. लॉकडाऊनमध्ये एक्सप्रेस वे रिकामा असताना हा पूल पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी एक पत्रक जारी करत यासंबंधीची माहिती दिली आहे.
4 ते 14 एप्रिल दरम्यान नियंत्रित स्फोटकांचा वापर करत हा पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल अन्य कारणानेही अडचणीचा ठरत होता. येथे अपघात ही मोठ्या संख्येने होत होते. त्यामुळेच आता हा पूल पडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.