मुंबई - लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ८ मार्चच्या आधी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये जमा होतील, असा विश्वास राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ९ मार्च रोजी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार की काय? अशी चर्चा सुरू सध्या झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निवडणुका जाहीर करण्याचा कार्यक्रम अत्यंत गुप्त असतो. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने देशातील वातावरण पाहून ४० ते ४५ दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. त्याच दिवसापासून आचारसंहिता घोषित केली जाते. सध्या राजकीय पक्ष अंतिम उमेदवारांची यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त असून, वित्त मंत्री मुनगंटीवार यांनी तर थेट आचारसंहितेचे संकेत दिले आहेत. साधारणतः एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याची चर्चा ही जोरात सुरू असून विरोधी पक्षातले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही ९ मार्चच्या दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. या तारखा गृहीत धरूनच आघाडी आणि युतीच्या बैठका संपवून अंतिम उमेदवारी यादी तयार करण्याचा राजकीय पक्षांचा कल दिसून येत आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ मार्चला करण्यात आली होती. तर मतदानाचा पहिला टप्पा १६ एप्रिलला सुरू करण्यात आला होता. महिन्याभराच्या कालावधीत देशभरात निवडणूक होऊन १६ मे रोजी निकाल जाहीर केला होता. तर बहुमत मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे रोजी शपथ घेऊन सरकार अस्तित्वात आणले होते. आता २०१९ च्या निवडणुकीनंतर २६ तारखेला या सरकारचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असून त्याआधी नवे सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने निवडणुकीचा कार्यक्रम आखला जाईल, यात शंका नाही. मात्र, निवडणूक आयोगाच्या कोणत्याही संकेताशिवाय मंत्र्यांनी आणि राजकीय नेत्यांनी ९ मार्च ही तारीख लोकसभेच्या निवडणूक घोषणेची असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.