मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः आपली गाडी चालवत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाल्याचे पाहायला मिळाले. कामाचा ताण वाढलेला असतानाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत या बैठकांना पोहोचत आहेत. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सुटी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कॅबिनेट मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांवरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. परंतु यावेळी ट्राफिक पोलिसांसह सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवून बैठकीसाठी पोहोचले.
नागरिकांना सूचना करत असताना सुरुवात स्वतः पासून करावी लागते व कठीण परिस्थितीत जबाबदारीने एका सेनापतीप्रमाणे लढावे लागते, असे रूप आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिसून आले.
कलनागर, मातोश्री परिसरात एक चहावाला पॉझिटीव्ह आढळल्यानंतर येथील परिसर सील करण्यात आला आहे. तसेच या चहावल्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, येथून मुख्यमंत्र्यांचे खासगी निवास स्थान मातोश्री जवळच असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांचीहीही तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे विविध बैठकांसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहचण्यासाठी बाहेर पडणारे उद्धव ठाकरे हे स्वतः गाडी चालवत आहेत.