मुंबई - 'आम्ही मजबूर नाही, तर मजबूत आहोत' हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही ठाकरे पंतप्रधान मोदी यांना दिली. शुक्रवारी (दि. 19 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रारंभी लडाख येथे झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंतप्रधानांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अशा समयी आपण जो संवाद साधला आहे ही प्रक्रिया अशीच सुरू राहावी. आम्ही आमच्याकडून या प्रश्नी आवश्यक ते सर्व सहकार्य निश्चितपणे करू. आपला भारत देश चीनपेक्षा कमजोर असल्याचा गैरसमज परसविण्यात आला आहे. पण, ही जूनी गोष्ट झाली. आमच्याकडेही सगळ्या शक्ती आहेत. पण, आपण कुणावर हल्ले करण्यासाठी उतावीळ नाहीत. आमचा भर नेहमी मुत्सद्देगिरी, चर्चा आणि संवादावर राहील. पण, याचा गैरफायदा कुणी घेणार असेल तर आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींना म्हणाले.
कोरोनाच्या काळात संधीचा फायदा घेऊन चीन दबाव तंत्र खेळते आहे. आधीच कोरोना विषाणू साथीसाठी चीन जबाबदार आहे, अशी संपूर्ण जगाची भूमिका असताना स्वत:चा आत्मविश्वास वाढवावा म्हणून चीन अशाही परिस्थितीत भांडण उकरून काढत आहे. त्यामुळे हे दबाव तंत्र झुगारून देणे गरजेचे आहे.
भारत-चीनच्या सैनिकांमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात हाणामारी झाली होती.या 20 भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी (दि. 19 जून) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 19 जून) राष्ट्राला संबोधित केले. चीनने घुसखोरी केल्याचे पंतप्रधान मोदींनी नाकारले, तसेच सीमेवरील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला सर्व अधिकार दिले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - चीनचा बदला कधी घेणार?.. सामनातून शिवसेनेची मोदींवर टीका