मुंबई - कोरोनाची परिस्थिती बघता पुण्यात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पहिल्या दिवसापासून म्हणणे आहे. पुण्यामध्ये घाईघाईने लॉकडाऊन उठवला त्यालाही मुख्यमंत्र्यांचा विरोध होता, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे शहराचे पालकमंत्री आहेत. त्यांनी राजकीय वजन वापरून पुण्यातील लॉकडाऊन उठवला का? असा प्रश्न राऊत यांच्या विधानावरून उपस्थित होत आहे.
पुण्यात कोरोना व्यवस्थापनात काही अडचणी असतील तर त्या दुरूस्त करून तिथे उत्तम सुविधा मिळतील याची जबाबदारी फक्त सरकारची किंवा महानगरपालिकेची नाही तर विरोधी पक्षासोबत सर्वांची आहे. शेवटी जनता आणि शहर हे सर्वांच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले. पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना सुनावले राऊत यांनी सुनावले आहे. कल्याण- डोंबिवली व मुंबईत जी कोविड सेंटर उभी केली आहेत, तिथे उत्तमप्रकारे काम चालले आहे. परिस्थिती बघता पुण्यातील कोविड सेंटरमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध होण्याअगोदरच ते सुरू केले, त्यामुळे काही त्रूटी निर्माण झाल्या आहेत.
पांडुरंग रायकर यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते, मात्र त्यांचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. त्यांना रुग्णवाहिका मिळण्यास उशीर झाला, हे दुर्दैव आहे. खरंतर पुण्यासारख्या ठिकाणी रुग्णवाहिका मिळू नये, याबाबतही सरकारने काळजी घेणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.