मुंबई - विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यात यावी म्हणून महाविकास आघाडीचे शिष्ठमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना भेटले होते. त्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्ष निवडणूक पदासाठी सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशा आशयाचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. ( CM Uddhav Thackeray Reply to Governor Bhagat Singh Koshyari ) या पत्राला आता मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आले आहे. कशा पद्धतीने ही निवडणूक योग्य आहे? याची माहिती या पत्रात दिली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिली.
आघाडी सरकार-राज्यपाल यांच्यात अनेक मुद्द्यांवर कलगीतुरा -
राज्यपालांना पुढे करून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजप राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर पडल्याचे संकेत दिसत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा महाविकास आघाडी व राज्यपाल यांच्यामध्ये अनेक मुद्द्यावर कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्व सोपस्कार पूर्ण करूनही राज्यपाल अनुमती देत नसल्याने महाविकास आघाडी विशेष करून काँग्रेस दबावात आहे. त्यातच मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये निलंबित केलेल्या १२ भाजपच्या आमदारांचे प्रकरण अजूनही जशास तसे असल्यामुळे हा वाद आता शिगेला पोहोचला आहे.