मुंबई : गेले काही दिवस शहरांमध्ये असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागाकडे वाढला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना सुविधा उभारण्यात शासन मदत करेल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, या सुविधा वापरायची वेळ येणार नाही, इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(गुरुवार) सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरमधील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरुपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले. इतर देश फक्त कोरोना एके कोरोना असा मुकाबला करत आहेत. मात्र, आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहर्रम पार पडला. त्यानंतर आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येणार आहे. त्यातच पाऊसही सुरू आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे असून हा कसोटीचा काळ असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी सर्व अधिकाऱ्यांना केले. असे झाल्यास १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे एकेक रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, 'चेस द व्हायरस' मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेन्मेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत केले आहे.
सुविधा उभारण्यात मदत केली जाईल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, या सुविधा वापरायची वेळ येणार नाही, इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात जनजागृती करण्याची गरज आहे. कारण, ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता. तसेच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यास मुख्यमंत्र्यांचा होता विरोध - संजय राऊत