मुंबई - आपल्याला काळजी घेऊन सांभाळून पुढे पाऊल टाकायचं आहे. कुठेही घाई न करता सरकार सुद्धा सावधगिरीने पावले उचलत आहे. जसे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लावले तसेच टप्प्याटप्प्याने जीवन पूर्वपदावर आणले जात आहे. मात्र, संकट टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा लढा अद्यापही सुरूच आहे. सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे. लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट जीवघेणी ठरू लागली, तर नाईलाजाने परत लॉकडाऊन वाढवावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
येत्या २२ जूनला पावसाळी अधिवेशन होणार होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग पाहता ३ ऑगस्टला पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरवले आहे. मात्र, गरज पडल्यास पुरवणी मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेऊ, असेही ते म्हणाले.
नवीन निकषानुसार नुकसान भरपाई - मुख्यमंत्री
चक्रीवादळामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. या भागाचा मंत्र्यांसह दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक नुकसान झाले असून पंचनामे करणे सुरू आहे. तसेच नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची गरज आहे. तशा सूचना देऊन नवीन निकष लागू केले. या नवीन निकषानुसार नुकसानबरपाई दिली जाईल. रायगड जिल्ह्याला तातडीने १०० कोटींची मदत दिली. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रत्येकी ७५ आणि २५ कोटींची मदत दिली. नुकसान झालेल्या स्थानिकांना नुकसान भरपाई देण्यास महाविकास आघाडी कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त भागात मोफत धान्य आणि रॉकेल देण्याचा निर्णय - उपमुख्यमंत्री
नुकसानग्रस्त भागात मोफत धान्य आणि रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कपडे आणि भांडीकुंडीसाठी प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये प्रतिकुटुंब, असे १० हजार रुपये दिले जाईल. घराच्या पडझडीसाठी ९५ हजार रुपये दिले जात होते. आता दीड लाख रुपये दिले जाणार आहे. तसेच पक्क्या घराच्या पडझडीसाठी यापूर्वी ६ हजार रुपये दिले जात होते. त्यांना आता १५ हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच दुकान, टपऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पंचनाम्यानुसार ८५ टक्के रक्कम किंवा १० हजार रुपये दिले जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.