मुंबई - कोरोना काळानंतर सार्वजनिक कार्यक्रमांना चालना मिळण्यासाठी मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये 'द मुंबई फेस्टिवल'चे महाराष्ट्र पर्यटन आणि थिंग्स 2do यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रम 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार आहेत. यातील विंटेज कार रॅलीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.
विंटेज कार महोत्सवाचे कुतूहल हे सर्वांनाच असते. मुंबईत या महोत्सवाला मोठी गर्दी असते. एक वेगळाच माहोल या ठिकाणी असतो. आज या विंटेज कारची बीकेसी ते बालर्ड पीआरपर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. यामध्ये 100 पेक्षा जास्त गाड्यांनी सहभाग घेतला होता. रविवारचा दिवस असल्यामुळे विंटेज कार पाहण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती.
मुख्यमंत्री दिसले वेगळ्याच मूडमध्ये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः कार प्रेमी असल्यामुळे त्यांनी या विंटेज गाड्यांची माहिती घेतली. नेहमी कुर्त्यामध्ये दिसणारे उद्धव ठाकरे आज कॅज्युअल लूकमध्ये दिसले. यावेळी त्यांनी एका दुर्मिळ गाडीमध्ये बसून फेरफटका देखील मारला. मुख्यमंत्र्यांना वेगळ्या लूकमध्ये अनेकदा पाहिले आहे. पण यावेळी व्हिंटेज कार रॅलीच्या आलिशान थाटावेळी ते वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी जांभळ्या रंगाचा उठावदार चेक्स शर्ट परिधान केला होता. व्हिंटेज कारसोबतच मुख्यमंत्र्यांच्या या हटके लूकनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
14 फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम
या उत्सवामध्ये चार चाकीच नाही तर दोन चाकी देखील असणार आहेत. 100 दुचाकीदेखील या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या गाड्यांचे कुतूहल असते.