मुंबई - पोलिसांसाठी जे करता येईल ते मी करेन. पोलीस कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण, घरे देण्यात येतील. सरकार तुम्हाला पाठबळ देऊ शकते. मात्र, त्यासाठी पोलिसांनी स्वतः हिंमत दाखवायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन मुंबईतील मारोळ पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी ते बोलत होते.
दरवर्षी २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. जवळपास ५८ वर्षांपूर्वी म्हणजे 2 जानेवारी 1961 ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना विशेष दर्जा प्राप्त झाला. तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले. लवकरच या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतिगृह, क्रिडासंकूल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या 16 इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.