मुंबई : वांगणी रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याची थरारक सुटका करणाऱ्या देवदूत मयुर शेळकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुकाची थाप मारली. मुख्यमंत्र्यांनी मयुरला फोन करत “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचे तुम्ही काम केले आहे.” असे गौरवद्गार काढले.
शब्दच नाहीत -
वांगणी स्थानकात 17 एप्रिला अंध महिलेसोबत चालत असताना रेल्वे ट्रॅकवर तोल जाऊन पडलेल्या लहानग्याची देवदूत मयुर शेळकेने थरारक सुटका केली. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मयुरच्या शौर्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली. त्यांनी मयुरला थेट फोन करुन त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. 'तुमचा थरारक व्हिडिओ पाहिला. माझ्याकडे शब्दच नाहीत. कल्पनेच्या पलीकडचे काम केलेत तुम्ही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तुम्ही मुलाचा जीव वाचवलात त्यामुळे आईचे खुप आर्शीवाद मिळाले असतील', असे मुख्यमंत्री म्हणाले. तर, 'तुमच्या कौतुकाने नक्कीच मला कुठेतरी अभिमान वाटतोय. तुम्ही वेळात वेळ काढून माझं कौतुक केले. तुम्ही कोरोना काळात समाजासाठी जे काम करताय, त्याच्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळत आहे', असे शेळकेने म्हटले. तर नक्कीच आपण सगळे चांगले काम करु, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं होतं?
एक अंध आई 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलाला घेवून वांगणी प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो मुलगा आईच्या हातातून सुटून ट्रॅकवर पडला. त्या माऊलीला हे कळालं की आपला मुलगा ट्रॅकवर पडलाय, पण काहीही दिसत नसल्याने तिला काय करावं? ते कळेना. तेवढ्यात तिला ट्रेनचा आवाज आला. तेव्हा ती आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरडाओरड करु लागली. याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळकेने हा सर्व प्रकार पाहिला आणि प्रसंगावधान राखत त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली. भरधाव येणाऱ्या मेलसमोर धावत त्याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाचे प्राण वाचविले. हा सर्व थरार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मयुर शेळके या पॉईंटमनच्या धाडसामुळे ट्रॅकवर पडलेल्या छोट्या मुलाचे प्राण वाचले आहेत.