मुंबई CM Shinde Taunt Opposition : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून मुंबईत स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केली. आज पहाटेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर तसंच मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल, पालिका अधिकारी यांच्यासोबत मुंबईतील अनेक ठिकाणी स्वतः या मोहिमेची पाहणी केली. (CM opinion on cleanliness campaign)
मुख्यमंत्र्यांनी जुहू चौपाटीची केली स्वच्छता : मुंबईत दिवसेंदिवस हवेची व प्रदूषणाची पातळी वाढत असून ती कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्यास घेतली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाच वॉर्डात स्वच्छता मोहीम राबविली. सर्वांत अगोदर मुंबईतील जुहू चौपाटी येथे त्यांनी स्वच्छता केली. त्यानंतर जुहू येथील इस्कॉन मंदिरात जाऊन राधा कृष्णाचं दर्शनही घेतलं. याप्रसंगी इस्कॉन बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, इस्कॉन विविध चांगले उपक्रम राबवत असून अन्नदान, पर्यावरण, तरुण मार्गदर्शनासह पालिकेच्या सोबत एकत्र येत रुग्णालय व शालेय अन्नदान करण्याचे मोठं काम मंदिर प्रशासन करत आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये इस्कॉनलासुध्दा आम्ही सहभागी करून घेणार आहोत. स्वच्छता मोहीम चळवळीवर मी स्वतः व्यक्तिशः लक्ष ठेऊन असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितलं आहे.
सफाई कामगार हा मुंबईचा खरा हिरो: यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचा सफाई कामगार हा मुंबईचा खरा हिरो आहे. मी त्यांना आवाहन केल्यानंतर पहाटे एक तास लवकर येऊन ते कामाला सुरुवात करतात. कारण पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या जनतेला धुळीचा त्रास होऊ नये म्हणून सफाई कामगार हा त्यांच्या अगोदर येऊन कामाला सुरुवात करतो. आमच्यावर कुणीही कितीही टीका केली तरी आम्ही त्या टीकांकडे लक्ष देत नाही. तर आम्ही नेहमी आमचं काम करत असतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
अद्ययावत ऑटोमॅटिक मशीन: जेव्हा दोन ते तीन हजार लोक एकत्र येऊन स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यामध्ये असणारा लोकांचा सहभाग हा फार मोठा असतो असे शिंदे म्हणाले. मुंबईला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अद्यावत प्रणालीची मशीन आणण्यात आली असून याचा उपयोग विशेषतः चौपाटीवरील कचरा स्वच्छ करण्यासाठी केला जाणार आहे. ही अद्यावत ऑटोमॅटिक मशीन दगड, कचरा, प्लास्टिक खेचून घेते व फक्त वाळू तिथे राहते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही अद्यावत मशीन चालवून पाहिली आणि जुहू चौपाटीवर एक फेरफटका मारला. त्याचबरोबर मुंबईतील झोपडपट्टी परिसरामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छ्ता अभियान राबविण्यात येत असून धारावीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि इतर परिसरसुद्धा स्वच्छ केला गेला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: