मुंबई - पुढचा पंतप्रधान म्हणून कोणता मराठी नेता पहायला आवडेल, शरद पवार की नितीन गडकरी? असा प्रश्न रितेश देशमुखने मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला. यावर ते म्हणाले, की पुढच्या दोन्ही निवडणुका नरेंद्र मोदींसाठी बुक आहेत. त्यामुळे हा प्रश्न आता गैरलागू आहे. मराठी नेता पंतप्रधानपदी बसलेला मला आवडेल, पण त्याची चर्चा आपण १० वर्षांनी करू. रितेशच्या अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी असे टोलवल्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
एका पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेता रितेश देशमुखने मुलाखत घेतली. यावेळी रितेशने अनेक विषयावर मुख्यमंत्र्यांना बोलते केले. अनेक अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनीही हजरजबाबीपणे उत्तरे दिली. भाजप-शिवसेना युती ते आगामी पंतप्रधानापर्यंतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलले.
महाराष्ट्राचा नेता पंतप्रधानपदी अजूनही बसला नाही, याची नेहमीच खंत व्यक्त केली जाते. यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत अनेकांना या पदाने हुलकावणी दिली. शरद पवार यांचे नाव आताही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधायची असेल, तर पवारच हे साधू शकतात असे बोलले जाते. त्यामुळे पवारांचे नाव चर्चेत आहे. याचाच धागा पकडून रितेश देशमुखने हा प्रश्न विचारला.
नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचा पर्याय पुढे केला जात आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू असते. त्यामुळे भारतीय जनता पक्षांतर्गत एका गटाची गडकरींच्या नावाला पसंती आहे, असे बोलले जाते. भाजपला आगामी निवडणुकीत बहुमत मिळाले नाही, तर इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. त्यावेळी सर्व पक्षात मान्यता असलेला चेहरा म्हणून गडकरींकडे पाहिले जाते.
या कार्यक्रमात रितेशने मुख्यमंत्र्यांना युतीबाबतही प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. युतीमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते खुश आहेत. जर अविचारी पक्ष एकत्र येत असतील तर दोन समविचारी पक्षांनी एकत्र येण्यात काय हरकत आहे, असेही ते म्हणाले.