मुंबई - सध्या मुंबईमध्ये सर्वच मेट्रोलाईनचे काम जोरात सुरू आहे. मात्र कांजूरमार्ग येथील कारशेड प्रश्न कोर्टात रखडल्या कारणाने मेट्रोसाठी कारशेड तयार करायचा कोठे? हा प्रश्न महाविकास आघाडी सरकार समोर अजूनही उभा आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिकऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत मेट्रो कारशेड संदर्भात चर्चा झाली असून कांजूरमार्ग येथे होणारा कारशेडचा प्रश्न कोर्टात अडकला असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांनी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश दिले आहे.
मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना पर्यायी जागा शोधण्याचे आदेश -
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार असताना कारशेड गोरेगावमध्ये आरेच्या जागेत बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पर्यावरणाच्या प्रश्नावर कारशेड कांजूरमार्गमधील जागेत हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मात्र कांजूरमार्ग मधील जागा राज्य सरकारची का, केंद्र सरकारची? हा वाद उभा राहिला. त्यानंतर या जागेच्या मालकी हक्कावरून काही व्यावसायिक न्यायालयात गेले आहेत. ज्यामुळे कांजूरमार्ग येथे कारशेडचा प्रश्न लांबणीवर जाऊ शकतो. हे पाहाता मुख्यमंत्र्यांनी आता अधिकाऱ्यांना पर्यायी जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत.